नागपूर, प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज नागपूर येथील संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचूक यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यापूर्वी व्हेरायटी चौक, सीताबर्डी येथून संविधान चौकापर्यंत लॉंग मार्च काढण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने लॉंग मार्चला परवानगी नाकारत संविधान चौक येथेच आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यानुसार संविधान चौक येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात माजी खासदार प्रकाश जाधव, राज्य संघटक सागर डबरासे, शहरप्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बनाईत,जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम मस्के,किशोर पराते,उमेश निकम, राजू कानोजिया,अपूर्वा पित्तलवार,मनोज चौधरी, सचिन कापसे, संदीप मालखेडे, किशोर धोटे, पुरुषोत्तम बन यांच्यासह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर टीका करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सोनम वांगचूक हे मागील सुमारे वीस दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. देशातील महत्त्वाच्या नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते.
आंदोलनकर्त्यांच्या मते, सरकारने त्यांच्या मागण्यांवर कोणतीही सकारात्मक भूमिका न घेता आंदोलनस्थळावरून त्यांना ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे देशभरातील विविध शहरांमध्ये निषेध आंदोलने होत असून नागपुरातील आंदोलन हे त्याच आंदोलन मालिकेचा एक भाग असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले.
संविधान चौक परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. सोनम वांगचूक यांची तातडीने सुटका करण्यात यावी आणि शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी पुन्हा एकदा करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात या विषयावर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

