(छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर मधील बांधकाम विभागात तब्बल २५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये बोगस वर्क ऑर्डरच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या कामांसाठी क्यूआर कोड एका नावाने आणि वर्क ऑर्डर दुसऱ्याच कंत्राटदाराच्या नावाने देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. सरत्या आर्थिक वर्षात डीपीसीतून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांवरही संशय व्यक्त केला जात आहे.
या कथित गैरव्यवहारात काही कंत्राटदार तसेच विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाणार असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून, सर्वांचे लक्ष आता चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे

