(डबल गॅस कनेक्शनवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! PNG असणाऱ्यांना LPG सिलिंडर मिळणार नाही, e-KYC अनिवार्य)
घरगुती गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम एलपीजी (LPG) सिलिंडर आणि पीएनजी (PNG) पाईप गॅस दोन्ही सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. त्याचबरोबर गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याबाबत हा मोठा बदल लागू केला आहे. नव्या नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीपासून पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती LPG सिलिंडर दिले जाणार नाहीत.
जर एखाद्या घरात PNG आणि LPG अशी दोन्ही कनेक्शन असतील, तर संबंधित ग्राहकांना त्यांचे LPG कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल, अशी स्पष्ट सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत नियमावली शनिवारी जारी करण्यात आली.
नव्या नियमांमध्ये नेमके काय बदल?
गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.
आधार कार्ड लिंक नसेल किंवा पत्त्यात तफावत असेल, तर नवीन गॅस कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते.
जुने LPG ग्राहकांनी ठराविक कालावधीत KYC अपडेट करणे आवश्यक आहे.
KYC पूर्ण न केल्यास गॅस सिलिंडर बुकिंग बंद होऊ शकते.
सरकारने हा निर्णय का घेतला?
सरकारच्या मते, गॅसचा काळाबाजार रोखणे आणि एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली अनेक गॅस कनेक्शन कमी करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होईल.
सरकारचा अंतिम निर्णय काय?
एका घरात PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन ठेवणे बेकायदेशीर ठरेल.
PNG कनेक्शन असलेले ग्राहक LPG सिलिंडर पुन्हा बुक करू शकणार नाहीत.
दोन्ही सुविधा असणाऱ्यांना LPG कनेक्शन परत करावे लागेल.
PNG ग्राहकांना नवीन LPG कनेक्शनसाठी अर्ज करता येणार नाही.

