धक्कादायक! ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात अटकेत; ‘मंत्र-तंत्र’च्या नावाखाली गंभीर आरोप

गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचे हात पाहून भविष्य सांगणारे म्हणून प्रसिद्ध असलेले कॅप्टन अशोक खरात आता स्वतःच कायद्याच्या जाळ्यात अडकले आहेत. 35 वर्षीय महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी खरात यांना बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अटक केली आहे.
कोण आहेत अशोक खरात?

अशोक खरात स्वतःला मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी असल्याचा दावा करतात. तब्बल २२ वर्षे सेवेत राहून त्यांनी अनेक देशांची सफर केल्याचे सांगितले जाते. निवृत्तीनंतर त्यांनी ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि रचना यावर अभ्यास केल्याचा दावा केला.
तसेच, त्यांनी ज्योतिषशास्त्रात सुवर्णपदक मिळवल्याचे सांगत स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण केली होती.
समाजात प्रभाव
अशोक खरात हे ‘शिवनिका ट्रस्ट’चे प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही ते पाहत होते. त्यांच्या नावाचा दबदबा इतका होता की, अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक त्यांच्या सल्ल्यासाठी येत असत.
नेमके आरोप काय?

35 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत अशोक खरात यांनी मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या विश्वासाचा गैरफायदा घेत गंभीर प्रकार घडवले.
सध्या काय स्थिती?या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक खरात यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अशा प्रकारच्या ‘भोंदूगिरी’विरोधातील कायद्यांची गरज आणि जागरूकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

